Tuesday, June 2 2020 3:47 am

मिरा-भाईंदरमध्ये आनंद परांजपेंना विक्रमी मताधिक्य मिळवून देणार – मुझफर हुसेन

ठाणे :- संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या पारड्यात मिरा-भाईंदर परिसरातून विक्रमी मताधिक्य मिळवून देणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मुझफर हुसेन यांनी जाहीर केले. शुक्रवारी आनंद परांजपे यांनी मिरा भाईंदर पश्चिम परिसरात प्रचार केला. यावेळी मुझफर हुसेन स्वतः रस्त्यावर उतरून मतदारांना आनंद परांजपे यांचा परिचय करून देत होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पी.आर.पी. (कवाडे गट), आर.पी.आय. (गवई गट), आर.पी.आय. (एकतावादी) या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार आनंद प्रकाश परांजपे याचे मीरा भाईंदर परिसरात मतदारांनी उत्साहात स्वागत केले. आपल्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, असा विश्वास देखील मतदारांनी यावेळी आनंद परांजपे यांना दिला.

ठाणे लोकसभा क्षेत्रापैकी मिरा-भाईंदरमध्ये 4 लाख 22 हजाराहून अधिक मतदार आहेत. प्रचारात मतदारांनी दाखविलेल्या उत्साह पाहून हे जागरूक मतदार आनंद परांजपे यांना सर्वात जास्त मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वास मुझफर हुसेन यांनी व्यक्त केला. मुझफर हुसेन स्वतः पायी चालत नागरिकांना भेटत आहेत. यावेळी लोकांशी प्रचार करताना मुझफर हुसेन यांनी विद्यमान युती सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारची ध्येयधोरणे चुकीचे असल्याचे हुसेन म्हणाले. या मतदारसंघातील प्रश्न समजून घेताना राजन विचारे यांना लोकांनी कधीच पाहिले नाही पण आता आनंद परांजपे या सुशिक्षित खासदाराला निवडणूक दिल्लीत पाठवण्याचा निर्णय मिरा-भाईंदरमधील जनतेने घेतला असल्याचे मुझफ्फर हुसेन यांनी सांगितले.

या प्रचार रॅलीमध्ये मिरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवक अनिल सावंत, झुबेर इनामदार, अश्रफ शेख, मर्लिन डिसा, रुबिना शेख, गीता परदेशी, फारुख शेख, राजीव मेहरा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.