Tuesday, July 7 2020 12:46 am

मालेगाव स्फोटाबाबत मला काहीच माहिती नाही; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

मुंबई:- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना  एनआयए कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.अखेर
साध्वी  ठाकूर यांनी आज एनआयए विशेष कोर्टात हजेरी लावली. कोर्टाने मालेगाव स्फोटाबाबत विचारणा केली असता मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे साध्वी  ठाकूर यांनी  सांगितले. कोर्टाने मागील आठवड्यात या प्रकरणातील आरोपींना  आठवड्यातून एकदा हजर राहण्याचे आदेश दिले होते.
आज एनआयए कोर्टात मालेगाव स्फोटाची सुनावणी सुरू झाली. आतापर्यंत साक्षीदारांच्या साक्षीवरून २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता, असे समोर आले आहे. यावर आपल्याला काही बोलायचे आहे का, असे कोर्टाने विचारले. यावर आपल्याला काही माहित नसल्याचे प्रज्ञासिंग ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर कोर्टाने आतापर्यंत किती साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आली याची माहिती तुम्हाला तुमच्या वकिलाने दिली का, या प्रश्नावरही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
प्रकृती अस्वस्थाचे कारण देत गुरुवारी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कोर्टात हजर राहण्याचे टाळले होते. मात्र, त्याच दिवशी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी राजपूत समाजाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वीच एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव प्रज्ञासिंह ठाकूर यांची जामिनावर सशर्त मुक्तता करण्यात आली आहे.