Wednesday, March 26 2025 5:49 pm

मालाडच्या कुरार गावातील रस्त्याचे काम विशेष प्राधान्याने करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 03 : मालाड (पूर्व) दिंडोशी येथील कुरार गावामधील रस्त्याचे काम विशेष प्राधान्याने पूर्ण करण्यासंदर्भात तातडीने महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, कुरार गावातील रस्ता रुंदीकरणाची तत्पर कार्यवाही करण्याबाबत महापालिका आयुक्तांना आजच सूचना देण्यात येईल. मालाड (पूर्व) येथील कुरार गाव, लक्ष्मणनगर जी. जी. महालकारी मार्ग ते संस्कार कॉलेजमधून जाणाऱ्या १८.३० मी. विकास नियोजन रस्त्यालगतचा भूखंड झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत विकसित होत आहे. या रस्त्यामुळे बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करुन रस्ता खुला करुन देण्याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास तसेच संस्कार महाविद्यालयातील विकास नियोजन रस्त्याने बाधित जमीन हस्तांतरित करण्याकरिता महाविद्यालयाच्या संचालकांना १३ जुलै २०२३ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

विकास नियोजन रस्ता खुला करण्याकरिता तेथील १५७ निवासी व १६ अनिवासी, अशा एकूण १७३ बाधित झोपडीधारकांचे प्रारुप परिशिष्ट बनविण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. अंतिम परिशिष्ट-२ बनवून पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत किंवा पर्यायी निवासी / अनिवासी सदनिका उपलब्ध करुन दिल्यानंतर सदर १८.३० मी. रुंदीच्या विकास नियोजन रस्त्यामधील बाधीत झोपड्या निष्कासित करुन या रस्त्याचे रुंदीकरण करुन वाहतुकीसाठी तयार करण्यात येणार असून काम गतीने होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांची बैठकही घेण्यात येईल, असे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.