ठाण्यातील मालवणी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी
दहा मान्यवरांचा सत्कार
ठाणे,१२ – एखादा उपक्रम २५ वर्ष चालवणे फार जिकिरीचे असते, तरी सीताराम राणे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या मालवणी महोत्सवाचा रौप्यमहोत्सव केला…आता त्यांनी सुवर्णमहोत्सवही साजरा करावा. अशा शुभेच्छा आमदार संजय केळकर यांनी कोकण ग्रामविकस मंडळाच्या मालवणी महोत्सवाला दिल्या. यावेळी व्यासपीठावर आयोजक सीताराम राणे, स्नेहलता राणे,भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण, मंडळाचे सरचिटणीस विनोद देसाई, खजिनदार संदीप शिंदे, रोहित देसाई, ज्ञानदिप जाधव, निकिता राणे आदी उपस्थित होते.
कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने ०२ फेब्रुवारी पासुन ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सुरु असलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप रविवारी (दि.११ फेब्रु.) रोजी झाला. त्यावेळी आ. केळकर बोलत होते. याप्रसंगी,डॉ. अमोल गिते, सुनील विजय भोगटे कु. स्पृहा जाधव, नंदकुमार झिपरू पाटील, निशा फुलसुंदर, डॉ. प्रविण बिरमोळे, सुहास चव्हाण, पंकज पाडाळे, गजेंद्र गोडकर, अरुण लोंढे आदी समाजहितैषी नररत्नांचा सत्कार आ. संजय केळकर व आयोजक सीताराम राणे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आ. केळकर यांनी, मी ठाणेकरांचा आपला हक्काचा माणुस आहे, त्यामुळे मालवणी महोत्सवाच्या उदघाटनाला आणि समारोपालाही उपस्थित असल्याचे सांगितले. पुढे बोलताना, साहित्यापासुन क्रिडा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रातील रत्ने कोकणात आहेत, सर्वाधिक भारतरत्न तर कोकणातच आहेत. वस्त्रहरणचे गंगाराम गवाणकरांसह अनेक मालवणी लोकांशी माझा घनिष्ठ संबंध आले किंबहुना, आता तर मालवणचा ठेवा साता समुद्रापार गेला आहे. अशा या मालवणी महोत्सवात गेले दहा दिवस ज्ञान,मनोरंजन, कोकणी मेवा आणि खाद्यसंस्कृती सोबतच पर्यावरण शुद्धतेचे ‘अग्निहोत्र’ करण्याची दुर्मिळ संधी नागरीकांना उपलब्ध झाली. कोकणातील अनेक लघुउद्योजक, दुकानदारांना रोजगार उपलब्ध करणाऱ्या या मालवणी महोत्सवाचा यंदा रौप्य महोत्सव साजरा झाला, तेव्हा भविष्यात सुवर्ण महोत्सवही साजरा व्हावा. अशा शुभेच्छा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केल्या.
मॉरिशसमध्ये साकारलेल्या छत्रपती शिवरायांच्या आठवणींना उजाळा
कोमसापच्या मॉरिशस येथील १७ व्या साहित्य संमेलनात स्वराज्य निष्ठा या नाटकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय साकारले तो अनुभव आ.संजय केळकर यांनी कथन करून तेथील आठवणींना उजाळा दिला. तसेच, रामकृष्ण परमहंस यांच्या भूमिकेनंतर छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याची गेल्या अनेक वर्षाची सुप्त इच्छा होती ती पूर्ण झाल्याचे आ. केळकर यांना सांगितले.