माजी महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे नागरिकांनी मानले आभार.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी हा कमी असल्याने करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली होती. त्यानुसार व करदात्यांचा करसवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून करसवलत योजनेस प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार जे करदाते सन २०२२-२३ या आर्थिाक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १६ जून ते १५ जुलै,२०२२ पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
यापूर्वी ठाणे महापालिका हद्दीतील जे करदाते सन २०२२-२३ या आर्थियक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर, अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी १५ जून,२०२२ पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला होता. परंतु हा कालावधी कमी असून करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली होती.
त्यानुसार जे नागरिक १६ जून ते १५ जुलै या कालावधीत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत ३ टक्के, १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभागसमिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत जमा करु शकतील. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे,याकरिता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे या कालावधीत प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० ते सायं ५.०० पर्यत सुरू राहतील. करदाते आपला कर www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर किंवा propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे भरु शकतील. तरी या करसवलत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा व मालमत्ता कर जमा करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.