Monday, March 24 2025 5:46 pm

मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू करण्यास मंजुरी ठाणे

दि. 10 (जिमाका) – केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स (बी) अंतर्गत ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून वीस विद्यार्थी क्षमतेचे नवीन मानसोपचार परिचर्या पदविका (डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग) या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयात सायकियाट्रिक नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने शिफारस केली होती. त्याशिफारसीनुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या अभ्यासक्रमास 20 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.त्यासाठी संस्थेला महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची संलग्नता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबरोबरच पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णातही हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रमामुळे मानसोपचार क्षेत्रातील परिचर्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. यांसंबधीचा शासन निर्णय वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने निर्गमित केला आहे.