ठाणे, 10 : घोडबंदर भागातील मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर येथील रहिवाशांचा क्लस्टरला विरोध असतांनाही महापालिकेकडून येथे क्लस्टर राबविण्यासाठी जोरदार हालचाली केल्या जात आहेत. परंतु स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता, केवळ बिल्डरांच्या हिताच्या दृष्टीने क्लस्टर राबिवली जात असल्याचा आरोप करीत एकता संघ बचाव कृती समितीने सोमवारी महापालिकेच्या क्लस्टर सेलच्या कार्यालयात धडक दिली. आम्हाला आमच्या जागा द्या आम्ही करतो आमच्या जागांचा विकास अशा घोषणा देत रहिवाशांनी पुन्हा एकदा क्लस्टर योजनेला विरोध दर्शविला आहे.
मागील आठवड्यात समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या शंकाच्या निरासन केल्याचा दावा महापालिकेने केला होता. परंतु या बैठकीला समितीमधील एकही सदस्य नसल्याचा दावा आता एकता संघ बचाव कृती समितीने केला आहे. त्यामुळे याचाच जाब विचारण्यासाठी समितीमधील सदस्यांसह येथील शेकडो रहिवाशांनी सोमवारी क्लस्टरच्या कार्यालयाला धडक दिली. आमचा आजही क्लस्टर योजनेला विरोध असल्याचे मत एकनाथ जाधव यांनी व्यक्त केले. रहिवाशांचा विरोध असतांना ही योजना त्यांना विश्वासात न घेता केवळ विकासकांच्या भल्यासाठी राबविली जात असल्याचा आरोप प्रदीप पूर्णेकर यांनी केला आहे. मुळात १०० टक्के झोपडपट्टी असतांना या भागात क्लस्टर योजना राबविली जाऊच शकत नसल्याचेही रहिवाशांनी यावेळी नमुद केले. वास्तविक येथील रहिवाशांवर क्लस्टरचा दबाव न टाकता आम्हाला आमच्या जागा द्या आम्ही करतो आमचा विकास असा नाराही यावेळी बक्षी यांनी दिला.
मागील सात महिन्यापासून येथील रहिवासी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत, विरोधाचे निवेदन देखील वारंवार पालिकेला देण्यात आलेले आहे. असे असतांनाही त्याचा विचार न करता क्लस्टरचे भुत येथील रहिवाशांच्या मानगुटीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात एवढे करुनही महापालिका प्रशासन जागी होणार नसेल तर आम्हाला यापुढे रस्त्यावरील आंदोलन करावे लागेल असा इशाराही येथील रहिवाशांनी दिला आहे.
विकास आराखड्यामुळे हजारो रहिवांशीची घरे होणार उध्दवस्त
एकीकडे क्लस्टरची जबरदस्ती सुरु असतांना मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा घाट विकास आराखड्याच्या माध्यमातून घातला जात आहे. तसेच गार्डनचे आरक्षण आदींसह इतर कारणांसाठी येथील रहिवाशांच्या घरावरच आरक्षण टाकले जात आहे. त्यामुळे येथील सुमारे ५ हजाराहून अधिक रहिवाशांची घरे उध्दवस्त होणार असून ते रस्त्यावर येणार असल्याचा आरोपही आता येथील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे क्लस्टरसह विकास आराखड्याला देखील आमचा विरोध असल्याचे यावेळी रहिवाशांनी नमुद केले आहे.