Monday, April 6 2020 3:12 pm

“माझ्या बापाने रक्त गाळून पक्ष उभारलाय, त्याला गालबोट लावाल तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे”

औरंगाबाद : मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा वादळी ठरला. सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नेत्यांमधील गटबाजी उफाळून आली आणि भर कार्यक्रमात अक्षरशः राडा झाला. त्यामुळे थेट सुप्रिया सुळे यांनाच माईक हातात घेऊन कार्यक्रम नियंत्रणात आणावा लागला कार्यक्रम नियंत्रणात आला खरा, मात्र ज्यांनी राडा केला त्यांना पक्ष धडा शिकवणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होतो आहे.

सुप्रिया सुळे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या असता त्यांना पैठणमध्ये कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागला. पक्षातील अंतर्गत संघर्ष हा इतका टोकाचा होता की अखेर सुप्रिया सुळे यांना राडेबाज कार्यकर्त्यांना आपल्या बापाला या पक्षासाठी रक्त गाळावं लागल्याची आठवण करून द्यावी लागली. कार्यकर्त्यांच्या तुफान राड्यात सुप्रिया सुळे यांची अवस्था चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी झाली होती. मात्र, सुप्रिया सुळे यांनी गटबाजीचं हे चक्रव्यूह भेदत राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना सार्वजनिकपणे सज्जड इशारा दिला.