Monday, September 28 2020 2:04 pm

माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक

मुंबई : मुंबईतील माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सहा शिवसैनिकांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आज या सगळ्यांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. उद्धव ठाकरेंबाबतचे आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याच्या कारणावरुन माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शुक्रवारी मुंबईत मारहाण करण्यात आली होती.

यानंतर १२ सप्टेंबरला या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली. आता रात्री उशिरा या सगळ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून त्या सगळ्यांना कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण :-

निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. कांदिवली पश्चिम येथे ही मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज शुक्रवारी व्हायरल झालं होतं.

यानंतर भाजपा नेत्यांनी शिवसेनवेर टीका करत कारवाईची मागणी केली होती.समता नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तर विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी हल्ल्यासाठी जबाबदार आरोपींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं होतं.

यानंतर काही तासातच हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असणारे कमलेश कदम आणि संजय मांजरे यांना अटक करण्यात आली.