Monday, January 27 2020 3:25 pm

महिलेचा गळा चिरून खून करणारा शेजारी अवघ्या दहा तासात जेरबंद

बीड -: शहरातील अयोध्या नगरातील शीलावती गिरी (वय ५०) महिलेचा गळा चिरून खून करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र, पेठ बीड पोलिसांनी अवघ्या दहा तासात खून प्रकरणाचा छडा लावून आरोपीस बेड्या ठोकल्या. करणी केल्याच्या संशयावरुन शीलावती गिरी यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अशोक जंगले असे त्या आरोपीचे नाव आहे. शीलावती यांच्या घरा शेजारीच अशोकचे घर आहे. अशोक व त्याची पत्नी अंजली यांच्यात नेहमीच वाद होत असत. शीलावती यांनी घरावर कारणी केल्यामुळेच आपल्या घरात वाद वाढले. आपल्या उद्धवस्त झालेल्या संसारासाठी शीलावती यांच कारणीभूत असल्याच्या संशयाने त्याच्या डोक्यात घर केले आणि त्यातून तो शीलावती यांच्यावर चिडून होता. शनिवारी सकाळी शीलावती या पती भिक्षा मागण्यासाठी गेल्याने घरात स्वयंपाक करीत होत्या. यावेळी अशोकने स्वत:च्या घरातून भाजी कापण्याची बतई घेतली आणि शीलावती यांच्या घरात प्रवेश करीत गळा चिरुन त्यांची हत्या केली. त्यानंतर बाजूच्या विहिरीत बतई टाकून तो दुचाकीवरुन पसार झाला.

अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पो. नि. बाळासाहेब बडे यांनी तपास सुरु केला. आरोपी निष्पन्न करुन अवघ्या १० तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी किसन गिरी यांच्या फिर्यादीवरुन अशोक जंगले विरोधात पेठबीड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

🔸 फरार होण्यापूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात :

शीलावती यांच्या हत्येनंतर अशोक दुचाकीवरून थेट इरगावला गेला. तिथून तो पायी पाडळशिंगीकडे निघाला. महामार्गावर जाऊन एखाद्या वाहनाने फरार होण्याचा त्याचा डाव होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याची दुचाकीही जप्त केली आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता अशोकला २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार कैलास लहाने पुढील तपास करीत आहेत.