मुंबई, 11: भारतातील प्रत्येक नागरिकाचा, गावाचा, शहराचा आणि राज्याचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचाव्यात, त्यांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भारतातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचविण्याचे शासनाचे ध्येय आहे. या यात्रेच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांच्या फायद्यापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या निमित्ताने प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आज देशभरातील विविध ठिकाणी नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दि.15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे संपूर्ण देशभरात आयोजन करण्यात आले आहे.
बृहन्मुंबईतील 227 प्रभागांमध्ये विशेष चार वाहनांद्वारे दि. 28 नोव्हेंबर 2023 ते दि. 26 जानेवारी 2024 पर्यंत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सी’ विभागातील माधव बाग, कावसजी पटेल मार्ग, सी. पी. टँक सर्कल, भुलेश्वर येथे नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार राम कदम, माजी आमदार अतुल शहा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आदींसह मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, चंदीगढ, जम्मू काश्मिर, बिहार आणि गुजरात येथील विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी यावेळी प्रातिनिधीक संवाद साधला.
‘विकसित भारत संकल्प यात्रे’बाबत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, देशभरातील कानाकोपऱ्यात यात्रा पोहोचत आहे. शेतकऱ्यांना बियाणे, आधुनिक अवजारे, वीज-पाणी, रुग्णांना वेळेवर उपचार-औषधे, बेरोजगारांना व्यवसायासाठी भांडवल, युवकांना रोजगार यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे. ग्रामीण भागातील दहा कोटी महिला विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. येत्या काळात याच योजनांच्या माध्यमातून दोन कोटी महिलांना लक्षाधीश बनविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी हे यावेळी म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रा अभियानाच्या माध्यमातून योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, त्याचा लाभ वंचित घटकाला मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात महाराष्ट्र एक नंबर येण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,विकासाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी शासनाच्या विविध योजना सर्व लाभार्थीपर्यंत पोहचण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी या सर्व घटकांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी या योजनांची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी हा प्रयत्न असणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्याचा आढावा घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत सुचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रातील विकास कामांसाठी केंद्र शासन पाठीशी आहे. राज्यात वेगाने विकास कामे सुरू असून विदेशी गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात राज्य अव्वल ठरेल असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणी, उज्ज्वला योजना, विविध क्रीडा योजना, आधारकार्डशी संबंधीत कामकाज आदींचे दालन उभारण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेतली. तसेच अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ 2) रमाकांत बिरादार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नियोजन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची जांभेकर, सी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे, नगर परिषद प्रशसनाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते.