Tuesday, November 12 2024 11:05 am

महिला बचत गटांची शक्तीपीठे करणार

45 ची वयोमर्यादा आणि प्रशिक्षणासाठी सरकारच्या दारात उभे राहणार
* महिला बचत गटांच्या महामेळाव्यात अशोक वैतींचा वादा

ठाणे, 27 – नुसती कागदपत्रे आणि व्हिजीटिंग कार्ड पुरते महिला बचत गट ठेवायचे नाहीत, वाढत्या महागाईच्या काळात आणि झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये महिला बचत गटांचे एक फेडरेशन करून त्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करून त्यांना उद्योगकर्ते बनवण्याची चळवळ आता सुरू झाली असून महिला बचत गटांच्या 45 वर्ष वयोमर्यादा वाढवून मिळण्यासाठी तसेच एकूणच उद्योग निती आणि अर्थसंकल्पात महिला बचत गटांचा विचार करण्यासाठी सरकारकडे भांडणार, असे आश्वासन ठाणे शिवसेना शहरप्रमुख अशोक वैती यांनी महिला बचत गटांच्या महामेळाव्यात दिलं.
रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या बचत गट मेळाव्यात ठाणे आरोग्य अधिकारी मुख्यमंत्री कक्ष प्रतिनिधी पवन गोसावी, जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, शहर प्रमुख अशोक वैती आदी मान्यवर उपस्थित होते.
सरकारी कर्मचारी 60 वर्षापर्यंतच्या वयोमर्यादा आहे. तोच धागा ओढत महिला बचत गटांच्या महिलांचे वय 45 एवढेच अधोरेखित केलेले आहे. त्याचा सरकारने पुनर्विचार करून हे वय 60 वर्षापर्यंत वाढवावे, अशी मागणी वैती यांनी केली. स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे महिला बचत सक्षमीकरण, शिक्षण आणि प्रशिक्षण फाउंडेशन ची स्थापना होणार असून, या फाउंडेशनमध्ये पूर्णपणे बचत गटांच्या प्रश्नांची झगडणारी टीम उभी करू, असा आश्वासन ही वैती यांनी दिलं.
व्यवसायापर्यंत जाणाऱ्या वाटांवरील छोटे-मोठे अनेक कोर्स आहेत. हे कोर्स या महिलांना प्रशिक्षित करून वेळप्रसंगी शासन आणि खासगीकरणातून जागा उपलब्ध करून, विविध उत्पादन बनवून, त्याचं मार्केटिंग करून ही महिलांची शक्तीपीठं उभी राहतील. त्यासाठी केवळ सरकारकडे बघूनही चालणार नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा, असेही प्रतिपादन यावेळी ही श्री. वैती यांनी केले. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या मेळाव्याला शेकडोंच्या संख्येत या बचत गटांच्या सभासद उपस्थित होत्या.