Thursday, June 20 2019 3:04 pm

महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादीचा घंटानाद आंदोलन

ठाणे –  राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याला निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला आणि लहान मुलींवरील बलात्कार, विनयभंगांच्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसून येते.
. गुन्हेगारांवर राज्याच्या गृहखात्याचा वचक नसल्यामुळे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो महिला कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद तसेच थाळी नाद केला. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नगरसेविका अपर्णा साळवी, राधाबाई जाधवर, अनिता किणे, अंकिता शिंदे, आरती गायकवाड यांच्यासह युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, विजया दामले, मेहरबानो पटेल, शशी पुजारी, अनिता मोठे, पूनम वालिया, स्मिता पारकर, कांत गपमल, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, गीता शिंदे, भानुपती पाटील, इंदू भोसले, सुविणा भिलारे, पुजा जाधव आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी सुजाता घाग यांनी सांगितले की, भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात आता महिला व मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. इतकेच नाहीतर महिलांना सुरक्षा देण्यात सरकार हतबल ठरले आहे. त्यामुळे असुरक्षिततेच्या वातावरणामुळे भयभीत झालेल्या व अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावरची लढाई लढणार असून, यासाठी प्रत्येक महिलेने पेटून उठणे गरजेचे आहे. तसेच, सरकारनेही या नराधमांवर वचक प्रस्थापित केला पाहिजे. जर, अत्याचारांच्या घटनांमध्ये घट झाली नाही तर आम्ही या सरकारच्याच गळ्यात घंटानाद करु, असा इशाराही त्यांनी दिला.