Saturday, August 24 2019 11:54 pm

महासभा रद्द करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अहंकारी ठामपा आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करा! ‘धर्मराज्य पक्षा’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाणे (प्रतिनिधी) : शहरांच्या विकासासाठी स्वायत्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याला आयोजित करण्यात येणारी महासभा ही करदात्या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाचा कारभार विस्कळीत झालेला असून, महापालिकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त संजीव जयस्वाल हेच या विस्कळीतपणाला सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप ‘धर्मराज्य पक्षा’ने केला आहे. याच पार्श्वभूमीवर महासभा रद्द करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अहंकारी आयुक्तांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या वतीने एका निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.दरम्यान, २१ मार्च-२०१८ रोजी ठाणे महानगरपालिकेची महासभा नियोजित असतानाही, ठामपाचे आयुक्त कोणत्याही ठोस कारणाशिवाय अनुपस्थित राहिल्याने, सदर महासभा रद्द करण्याची नामुष्की महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर ओढवली होती, याची मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून, आपल्यावरील आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याने महासभेस उपस्थित राहू शकलो नसल्याचे कारण ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेले असले, तरी प्रशासकीय कामकाजासंदर्भात अशापद्धतीची वैयक्तिक कारणे सांगून महासभेस अनुपस्थित राहणे हे एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला शोभत नसल्याचे ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

ठाणे शहरातील विकासकामांच्या नावाखाली आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मध्यंतरीच्या काळात कामांचा धडाका लावलेला असला तरी, आता त्यातही खंड पडून आयुक्त महाशय आपल्यावरील वैयक्तिक आरोपांच्या सबबीखाली बदलीची भाषा वापरत आहेत, जे पलायनवादाचे लक्षण आहे. एकीकडे ठाणे महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांच्या दबंगगिरीपुढे लाचार होत असताना, दुसरीकडे मात्र कर्तव्यदक्ष महापौर मीनाक्षी शिंदे ह्या हतबल होताना दिसत आहेत आणि याला ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे अहंकारी आयुक्त संजीव जयस्वाल हेच पूर्णपणे जबाबदार असून, त्यांच्यावर त्वरित योग्य त्या महापालिका अधिनियमाच्या कलमांद्वारे कायदेशीर कारवाई करावी व २१ मार्च-२०१८ रोजीची करदात्या ठाणेकर नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेली महासभा रद्द करण्याबाबतचा अहवाल मागवून तो प्रसिद्ध करावा, अशी ठाम मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात शेवटी केली आहे.