Tuesday, July 23 2019 2:56 am

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील निवडणूका लढवणार-नारायण राणे

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका स्वबळावर  लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली आहे.

सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले आहेत. मागील चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आलेला नाही हे आपले दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलतांना राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱया जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे. यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱया सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासासाठी दरवषी नवीन प्रकल्प जिह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.