Saturday, June 14 2025 5:05 pm

महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ लागू

आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आली प्रत्यक्षात , आज शासन निर्णय जारी झाला

देशातील ७३ तर महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्राची योजनेत निवड

राज्य सरकारच्या निधीतून ज्येष्ठ नागरिकांना घडविणार मोफत तीर्थ दर्शन , यंदा योजनेसाठी ६०० कोटींची तरतूद

ठाणे, 15 – महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यास मान्यता देणेबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केला आहे , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. हि योजना सुरु करण्याची मागणी व पाठपुरावा करून विधानसभेत आमदार सरनाईक यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर मुख्यमंत्र्यानी हि योजना लागू करण्याची घोषणा केली होती आणि आज त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. यावर्षी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास ६०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. या योजनेतून दरवर्षी हजारो ज्येष्ठ नागरिकाना मोफत तीर्थ दर्शन राज्य सरकार कडून घडविले जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने हा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. भारत देशात विविध धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचे/भगवंताचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजना लागू करण्याची महत्वाची घोषणा केली होती.

राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यास आजच्या शासन निर्णयातून मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना असे योजनेचे नावं असून या योजनेचे उद्दिष्ट राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करुन देणे आहे.

सविस्तर शासन निर्णय प्रसिद्ध
योजनेची व्याप्ती व अंमलबजावणीची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल , पात्रता , अपात्रता , लाभार्थ्यांची निवड , योजनेसाठी लाभार्थी निवड करण्याची प्रक्रिया कशी असेल याबाबत शासन निर्णयात सगळी माहिती आहे.

एका भक्तासाठी ३० हजारांचा खर्च
या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला असून या तीर्थ स्थळांच्या यादीत यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु. ३०,०००/- इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल. महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय ?
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे , त्याचे वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा , लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे असे पात्रता निकष आहेत.
तसेच या तीर्थ दर्शन योजनेत प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इ. हे आजार नसावे. अशी एक अट आहे.
अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे) असे काही निकष आहेत.

ही कागदपत्रे आवश्यक

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी लवकरच वेबसाईट तयार केली जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार कार्ड/रेशनकार्ड , महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
तसेच लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे.

त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड व जो तीर्थ दर्शन यात्रेला जाणार आहे त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे.

तीर्थ दर्शन कसे घडविणार ?
सदर योजनेंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात समिती
तीर्थ दर्शन योजनेसाठी प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाणार आहे.
प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल. म्हणजेच जास्त अर्ज आले तर लॉटरी काढावी लागणार आहे.

७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की, त्याचा जीवनसाथी/सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.

भारतातील ७३ तीर्थक्षेत्रे समाविष्ट
या तीर्थ दर्शन योजनेत भारतातील सुप्रसिद्ध ७३ तीर्थ क्षेत्रांची यादी निश्चित करण्यात आली आहे. वैष्णोदेवी मंदिर, कटरा , अमरनाथ गुहा, मंदिर , सुवर्ण मंदिर, अमृतसर , अक्षरधाम मंदिर दिल्ली, श्री दिगंबर जैन लाल मंदिर दिल्ली यासह चारधाम यात्रेतील तीर्थे , बद्रीनाथ मंदिर, गंगोत्री मंदिर, केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग, नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेश, काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी, इस्कॉन मंदिर, वृंदावन व सर्वात महत्वाचे श्रीराम मंदिर, अयोध्या अशा तीर्थ क्षेत्रांचा समावेश आहे. श्री जगन्नाथ मंदिर, पुरी , महाकालेश्वर मंदिर – उज्जैन अशा सर्व प्रसिद्ध तीर्थ स्थळांचा समावेश करण्यात आला आहे