Wednesday, June 3 2020 11:19 am

महाराष्ट्र बचाव आंदोलनातून भाजपकडून राज्य सरकारचा निषेध

ठाणे : कोविड-१९ चा महाराष्ट्राला विळखा पडला असतानाच, ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्यात आज महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या शहर कार्यालयाबाहेरच शहरातील ११ मंडल कार्यालये आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या इमारतीखालील मोकळ्या जागेत उभे राहून राज्य सरकारचा तीव्र निषेध केला.
भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील मुख्य कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, नगरसेवक संदीप लेले आदींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई-ठाण्याबरोबरच आता ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोविडचे रुग्ण आढळत आहेत. मात्र, त्याचे राज्य सरकारला गांभीर्य नाही. `लॉकडाऊन’मध्ये जनतेला मदत करण्यात स्वारस्य उरलेले नाही. देशातील अनेक राज्यांकडून सामान्य जनतेसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील जनता अजूनही उपेक्षित आहे. राज्य सरकारच्या अक्षम्य कारभाराविरोधात आज आंदोलन करण्यात आले, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. ठाण्यातील रुग्णांना अजूनही अॅम्ब्युलन्स व रुग्णालयात जागा मिळविण्यासाठी तिष्ठत राहावे लागते, अशी खंत आमदार डावखरे यांनी व्यक्त केली.
`महाराष्ट्र बचाव आंदोलन’चे `आंगण हेच रणांगण’ असे स्वरुप होते. त्यानुसार भाजपच्या शहरातील ११ मंडलांमध्येही आंदोलन करण्यात आले. काळे कपडे किंवा काळी फित लावून कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्याचबरोबर राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकाविले. या आंदोलनात अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या इमारतीखालील मोकळ्या जागेत आंदोलन करीत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.