Friday, May 24 2019 9:20 am

महाराष्ट्र क्रांती सेनेचे प्रस्थापितांना आव्हान !

 ठाणे, पालघरमधील विधानसभेसह लोकसभाही लढवणार 

ठाणे -: दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायरेश्वरी स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना आव्हान देणार असून ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व विधानसभा व लोकसभा जागा महाराष्ट्र क्रांती सेनेचे उमेदवार लढवणार आहेत. 
          त्यासाठी लवकरच ठाणे जिल्ह्यात सेनेचे विराट मेळावा आयोजित केला जाणार असून समाजातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन आज पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी ठाण्यात केले.
         राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्ष जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असून राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, आर्थिक आणीबाणी अशा समस्या आ वासून उभ्या आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र क्रांती सेना येत्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार असे पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी सांगितले. लोकसभा  निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ‘मक्रांसे’च्या कार्यकर्त्यांची चाचपणी सुरु आहे. त्यांच्या भेटीगाठीनंतर  पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने मक्रांसे स्थापन झाली असून शनिवारी नाशिकमध्ये या सेनेची जाहीर सभा होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे ‘भिजत घोंगडे’ अद्यापही कायम असून राज्य सरकारने धनगर आरक्षणाची शिफारस त्वरित केंद्र सरकारकडे करावी, अन्यथा येत्या निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसेल, असे स्पष्ट मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी मक्रांसेचे चंद्रकांत सावंत, ठाणे शहर अध्यक्ष अविनाश पवार, निमंत्रक रवींद्र साळुंखे, डॉ. मीनल पाटील, सुरेश भोसले उपस्थित होते.
 तिसऱ्या आघाडीची तयारी
रघुनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलेल्या नऊ ते दहा शेतकरी संघटना ‘मक्रांसे’सोबत येणार असून इतर पक्षांसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्याची चाचपणी सुरु असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्याचा सर्व्हे सुरु केला असून त्यानुसार विभागवार मेळावेही आयोजित केले जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.