Tuesday, March 18 2025 12:28 am

महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, 8 : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला सामजंस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी मॉरिशसच्या पर्यटन मंत्रालयचे दुष्यंतकुमार बकोटवार, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.महाजन म्हणाले, महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये झालेला सामंजस्य करार हा पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.दोन्ही प्रदेशातील पर्यटन-संबंधित उद्योग वाढवण्याच्या उद्देशाने पर्यटन क्षेत्रातील क्षमता वाढविणे,परस्पर भेटी, बैठका आणि सुसंवाद दृढ करणे,आपल्या क्षेत्रातील अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम यशोगाथांची माहिती देणे यावर भर देण्यात येईल.सागरी पर्यटन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, नैसर्गिक वारशाचे संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर हा करार दोन्ही प्रदेशातील संस्कृतीची ओळख करून देणारा ठरेल, असेही मंत्री श्री.महाजन म्हणाले.