Monday, January 27 2020 2:59 pm

महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई

पुणे-: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जोरदार वेगवेगळ्या खेळाच्या प्रकारात झुंज चालताना दिसत आहे.  बॉक्सिंग ह्या खेळ प्रकारात नेहमीच हरयाणा, दिल्ली आणि मणिपूर या राज्यातील खेळाडूंचे आव्हान नेहमीच महाराष्ट्र समोर राहिले आहे. त्याचप्रकारे महाराष्ट्राने बॉक्सिंगमध्ये हरयाणा व मणिपूर यांच्या आव्हानास यशस्वीरीत्या सामोरे जात १७ वर्षांखालील वयोगटात पाच सुवर्णपदकांची कमाई केली. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुणेले, बिस्वामित्र चोंगथोम, शेखोमसिंग व येईफाबा मितेई हे सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.

देविकाने ४६ किलो गटात हरयाणाच्या तमन्नावर मात करीत दिवसाची सुरुवात सोनेरी केली. मितालीने ६६ किलो गटात हरयाणाच्या मुस्कानला ४-१ अशा फरकाने पराभूत केले. मुलांच्या ४८ किलो गटात महाराष्ट्राच्या चोंगथोमने मिझोरामच्या जोरामुओनावर ४-१ अशी सहज मात करीत सुवर्णपदक जिंकले. शेखोम सिंगने ५० किलो गटात सुवर्णपदक जिंकताना मिझोरामच्या लाल्दिसांगाचा पराभव केला. पुण्याच्या आकाश गोरखाला आणि लैश्राम सिंगलाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सर्व लढती प्रेक्षणीय होत्या.