Monday, June 17 2019 4:05 am

महाराष्ट्रात भारनियमनचा भार

मुंबई : महाराष्ट्रभर सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट येऊन ठेपल आहे. चंद्रपूर, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णकि वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने ही परिस्थिती आली आहे.

सध्या राज्यात 400 ते 500 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे, त्यामुळे वीज उपलब्ध नाही. तसेच ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे. परिणामी लोडशेडिंग सुरु करण्यात आले असून ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे.

औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होत आहे. ऑक्टोबर हिटमुळे जनता हैराण असताना लोडशेडिंगमुळे अधिकच हैराण झाली आहे. G1, G2 आणि G3 या तीन गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे.

कोळशाच्या तुटवडा, कोयना जलविद्युत केंद्रात पुरेसा पाणीसाठा असला तरी, पाणीसाठा राखीव ठेवावा लागत असल्याने अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा, खुल्या बाजारात वीज महाग तसेच पुरेशी उपलब्धता नसल्याने विकत घेण्यात अडचणी, शेजारच्या राज्यात निवडणुका तोंडावर असल्याने जास्त वीज त्या राज्यांमध्ये खर्च होत असल्याने भारनियमनाचा भार राज्यावर कोसळला आहे.याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं म्हटलं आहे.