Monday, March 24 2025 6:03 pm

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त चरित्र ग्रंथ संशोधक बाबा भांड यांचे व्याख्यान

 

ठाणे 03 : ठाणे शहराला सांस्कृतिक उपराजधानी म्हणून नावलौकिक प्राप्त आहे,गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह व विविध सांस्कृतिक कट्टयाच्या माध्यमातून ठाण्यातील सांस्कृतिक चळवळ बहरत असून ठाणेकरांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व कार्यक्रमांना मिळत आहे, ठाणे महापालिकेच्या माध्यमातूनही पं. राम मराठे महोत्सव, पी. सावळाराम पुरस्कार आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमाबरोबरच व्याख्यानाच्या माध्यमातून वैचारिक उपक्रम राबविण्याचाही ठाणे महापालिकेचा मानस असल्याचे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

याचाच एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त चरित्र ग्रंथ संशोधक प्रा. बाबा भांड यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. 6 फेब्रुवारी रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांची पुण्यतिथी असून त्या निमित्ताने रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सायं. 6 वा. हार्बर हॉल, टीपटॉप प्लाझा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त श्री. बांगर यांनी दिली. या कार्यक्रमास ठाणेकर रसिकांनी मो्ठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरिता विशेषत्वाने ओळखले जात होते. पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक अशी त्यांची ओळख असून सन 1881 ते 1939 या त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेले राजकीय, सामाजिक कार्य ज्येष्ठ चरित्र ग्रंथ संशोधक प्रा. बाबा भांड उलगडणार आहेत.

प्रा. बाबा भांड हे मराठी भाषेतील लेखक, कांदबरीकार व प्रकाशक आहेत. आजवर त्यांनी 1700 हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यांच्या स्वत:च्या दहा कांदबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या ‘दशक्रिया’ या कांदबरीच्या अनेक आवृत्या निघाला असून त्याला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे. बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी आणि गुजराथी भाषेमध्ये देखील अनुवाद झाला आहे. एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.

तरी सर्व ठाणेकरांनी रविवार 5 फेब्रुवारी रोजी सायं. 6.00 वा. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.