Friday, January 17 2025 7:28 am
latest

‘महाप्रित’च्या विशेष कार्य अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती

मुंबई, ‍‍9 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या सहयोगी उप कंपनीच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी बिपीनकुमार श्रीमाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. श्रीमाळी हे सेवानिवृत्त वरिष्ठ सनदी अधिकारी असून ते यापुर्वी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित” (महाप्रित)” या नावाची सहयोगी उप कंपनीची, कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत स्थापन झाली. महाप्रित या उप कंपनीमार्फत बदलत्या काळाची गरज, मागास व दुर्बल समाजाच्या गरजा व वाढत्या आकांक्षा लक्षात घेऊन, केंद्र व राज्य शासनाची विविध उद्दिष्टे, योजना व उपाय योजना एकत्रित करुन मागासवर्गीय समाजाच्या सर्व समावेशक विकासासाठी ‘नवयुग योजना’ आखली आहे. या उपकंपनीच्या सहभागाने शासन ते शासन (Govt. to Govt.) प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत महाप्रित या उप कंपनीमार्फत ठाणे महानगर पालिका क्षेत्रात (टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर) एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत समूह विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यभरात इतर अनेक महत्वपूर्ण प्रकल्प ‘महाप्रित’ मार्फत राबविण्यात येणार आहेत.