Wednesday, February 26 2020 9:45 am

महापौर जनसंवादातच झाले नागरिकांच्या समस्यांचे निराकरण नागरिकांनी मानले महापौर नरेश म्हस्के यांचे आभार

ठाणे : महापौर नरेश म्हस्के यांच्या  अभिनव संकल्पनेतून प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आजच्या पहिल्या ‘महापौर जनसंवाद’ या उपक्रमास नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. महापौर जनसंवादातच बाधीतांचे पुनर्वसन, कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, भटक्या कुत्र्यांची समस्या, येऊर येथील साफसफाई, वैद्यकीय सेवा सुविधा,दिव्यांगांचे प्रश्न आदी  प्रश्नांचे तासाभरातच निराकरण झाल्याने नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के यांचे व प्रशासनातील  अधिका-यांचे आभार व्यक्त केले.

            सर्वसामान्य नागरिकांना लोकप्रतिनीधी व प्रशासनाच्या  अधिका-यांना थेट भेटून समस्या मांडता याव्यात यासाठी  महापौर नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या महापौर जनसंवाद या उपक्रमाचा शुभांरभ आज करण्यात आला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, ‍शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्‌के, अतिरिक्त आयुकत 1 राजेंद्र  अहिवर,अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, मनिष जोशी यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख उपस्थीत होते.

            या उपक्रमास ठाणे शहरातील विविध भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी 20निवेदने प्राप्त झाली. यामध्ये अर्जदाराने आपले म्हणणे प्रत्यक्ष महापौर व प्रशासनाच्या  अधिका-यांसमोर  मांडल्या, यावर महापौर नरेश म्हस्के यांनी संबंधित विभागाशी चर्चा करुन बहुतांशी अर्ज निकाली काढले. तात्काळ समस्या  निराकरण करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. यावेळी विविध कर आकारणी याबाबतही प्रश्न उपस्‌थीत करण्यात आले. एखाद्या व्यक्तीला अनावधनाने कराची रक्कम अनियमित आली असेल तर त्याबाबत ‍निश्चीत मार्ग काढला जाईल परंतु करच भरणार नाही अशी जर नागरिकांची भूमिका असेल तर ती योग्य नाही, शेवटी महापालिकेला विकासाची कामे ही कररुपी उत्पन्नातून करावी लागतात, त्यामुळे नागरिकांनी देखील कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असेही महापौरांनी यावेळी नमूद केले. नागरिकांनी मांडलेल्या समस्या तात्काळ  सोडविण्याबाबत आदेश पध्दतीने व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यामुळे नागरिकांनी महापौरांचे आभार व्यक्त केले.

            सरकारी काम आणि चार दिवस थांब अशी काहीसे महापालिकेबाबतचे मत नागरिकांच्या मनात असते. त्यामुळे नागरिक अनेकदा आपल्‌याला भेडसावत असलेल्या समस्या सुटणार नाहीत म्हणून मांडतही नाहीत. तर अनेकदा त्यांनी केलेल्या तक्रारीचे निराकरण होण्‌यास  विलंब होतो, परंतु नागरिकांना थेट समस्या मांडता याव्यात यासाठी हा उपक्रम राबवायचे ठरवले आणि त्याला आयुक्त संजीव जयस्वाल  यांच्यासह प्रशासनातील  अधिका-यांनी सुध्दा सहकार्य केले असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले. या महापौर जनसंवादात जे तक्रारींचे अर्ज प्राप्त झाले आहे, ते संबंधि त विभागाकडे पाठवून त्या समस्या तात्काळ सोडविण्याबाबतचे आदेशही प्रशासनास दिले आहेत व त्याबाबत ‍नियमित पाठपुरावा करणार असल्याचेही महापौरांनी यावेळी नमूद केले.