संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पारदर्शीपणे सदनिकांचे वाटप
रहिवाशांनी मानले महापालिकेचे आभार
ठाणे (22) : वर्तकनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या म्हाडा इमारत क्रमांक 54,55,56 या अतिधोकादायक इमारती महापालिकेच्यावतीने निष्कसित करण्यात आल्या होत्या. त्या जागेवर पी.पी.पी तत्वावर बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीतील सदनिकांची संगणकीय पध्दतीने आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सोडत काढण्यात आली. सोडतीच्या माध्यमातून पात्र सदनिकाधारकांना सदनिकेची ताबा पावती आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्यात आली. मालकी तत्वावरील कायमस्वरुपी सदनिका रहिवाशांना मिळाल्याबद्दल त्यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे, माजी नगरसेविका विमल भोईर, राधिका फाटक, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.
वर्तकनगर येथील म्हाडाच्या इमारत क्रमांक 54,55,56 या इमारतीमध्ये ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्प व रस्तारुंदीकरणात बाधित झालेले रहिवाशांचे पुनर्वसन व 57 महापालिका कर्मचारी राहत होते. सदर इमारती अतिधोकादायक झाल्याने त्या महापालिकेमार्फत निष्कसित करण्यात आल्या होत्या. या इमारतीची पुर्नबांधणी करुन तेथील बाधित व महापालिका कर्मचारी यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणेबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ् शिंदे यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार सदर भूखंडावर पी.पी.पी. तत्वावर नव्याने इमारत बांधण्यात आली. या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये आज 130 पात्र बाधित सदनिकाधारकांना कायमस्वरुपी मालकी हक्काने व 57 महापालिका कर्मचाऱ्यांना सेवेत असेपर्यत तात्पुरत्या स्वरुपात सदनिका वितरीत करण्यात आल्या. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त 1 व 2 यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मनिष जोशी यांच्या उपस्थितीत अत्यंत पारदर्शीपणे संगणकीय पध्दतीने सदनिकांची सोडत काढण्यात आली.
पी.पी.पी तत्वावर बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये ए व बी अशा दोन विंग असून एकूण 30 मजल्यांची इमारत आहे. इमारतीच्या ए व बी विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर सहा सदनिका आहे. ए विंग मधील 23 व्या मजल्यापर्यतच्या 130 सदनिका या बाधित रहिवाशांना व बी विंग मधील 10 मजल्यापर्यतच्या 57 सदनिका आज वितरीत करण्यात आल्या. 269 चौ.फूटाचे वनबीएचके अशा स्वरुपाच्या या सदनिका आहेत.