Friday, February 14 2025 7:38 pm

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी उत्पन्न दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरणार

खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश

ठाणे, 16:- ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामधील काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला अनिवार्य अशी अट होती. सदरची अट रद्द करुन उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी शिधापत्रिका ग्राह्य धरावी अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती. याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे मान्य केले असल्याने या योजनांचा लाभ आता जास्तीत जास्त महिलांना मिळणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांची आज प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा केली. यावेळी माजी महापौर मिनाक्षी शिंदे व माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे हे ही उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी उत्पनाच्या दाखल्याची अट ठेवण्यात आली होती. परंतु या अटीमुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहत होत्या. त्यामुळे सदर अट शिथील करण्याबाबत संबंधित महिला व बहुतांशी माजी नगरसेवकांनी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी दिनांक 8 जानेवारी रोजी आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेवून शिधापत्रिका ग्राह्य धरण्याचे आदेश संबंधित विभागास दिले आहे.

दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू महिलांनासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यावर्षी देखील सन 2024-25 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

यामध्ये योजना क्र. 5 – दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या महिलांना (एच.आय.व्ही.ग्रस्त/कॅन्सर ग्रस्त/डायलेसिस/अर्धांग वायु इत्यादी गंभीर आजार) उदरनिर्वाहासाठी अनुदान देणे. योजना क्र. 6-कोणत्याही कारणांमुळे पतीचे/कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल/विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाबाबत योजना राबविणे व योजना क्र.7 – 60 वर्षांवरील विधवा/घटस्फोटीत ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थ सहाय्य देणे आदि योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी प्रशासनाने निश्चित केलेली उत्पन्न दाखल्याची अट रद्द होवून अर्जदारांची शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.