ठाणे (२9) : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील कामाचा आढावा शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी वागळे प्रभाग समिती कार्यालयात घेतला. त्यावेळी, नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची नवीन इमारत आणि कोपरी उप समिती प्रभाग कार्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती या दोन्ही गोष्टी प्राधान्याने हाती घेण्यात याव्यात. त्याचा प्रस्ताव जलद गतीने सादर करून आचारसंहिता पूर्ण झाल्यावर त्याच्या मंजुरीची, निधीसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांना चांगले प्रशासकीय कार्यालय मिळणे आवश्यक असल्याचेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
तसेच, महापालिकेच्या ज्या वास्तू जुन्या झाल्या आहेत त्यांचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक आहे. म्हणूनच, नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेची रुग्णालये, शाळा, मार्केट आणि प्रशासकीय कार्यालये आदी जुन्या वास्तूंचा कायापालट करण्याची मोहीम सुरू करण्यात यावी. इमारतीची दुरुस्ती, अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी, प्रवेश आणि निकास मार्गिका, पार्किंग, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा यांच्या बद्दलचा सविस्तर आराखडा येत्या महिनाभरात बांधकाम विभागाने तयार करावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नागरिकांना महापालिकेच्या वास्तूंमध्ये यावेसे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कोपरी आणि नौपाडा क्षेत्रातील सी वन या अतिधोकादायक वर्गवारीतील २६ इमारती अजूनही व्याप्त आहेत. त्यात, १७८ कुटुंबे आणि ६७ दुकाने आहेत. यांचे निष्कासन करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात यावा. त्याची गांभीर्याने अंमलबजावणी केली जावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
तत्पूर्वी, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहायक आयुक्त सोपान भाईक यांनी कोपरी – नौपाडा प्रभाग समिती क्षेत्राबद्दल सादरीकरण केले. तसेच, उपनगर अभियंता विकास ढोले, रामदास शिंदे, विनोद पवार, शुभांगी केसवानी यांनी विविध प्रकल्प, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था यांचा आढावा घेतला. या बैठकीला, अतिरीक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे आदी प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.