Thursday, December 5 2024 7:02 am

महापालिका इमारतीसह महापालिका शाळांतील शौचालये अद्ययावत करावीत – आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 16 : शहरातील सार्वजनिक शौचालयांबरोबरच महापालिकेच्या इमारतीतील शौचालये ही चांगल्या दर्जाची, नियमित स्वच्छ असणे आवश्यकच आहे. महापालिकेत नागरिक विविध कामांसाठी येत असतात व ते शौचालयाचाही वापर करतात, महापालिकेतील शौचालये जर अस्वच्छ असतील तर मग सार्वजनिक शौचालयांची काय अवस्था असेल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्यावाचून राहत नाही. यासाठी सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेबरोबरच सर्व प्रथम महापालिका इमारतीतील सर्व शौचालये स्वच्छ व चांगल्या दर्जाची असावीत असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार महापालिका भवनातील तळमजल्यावरील सर्व सुविधांसह शौचालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून या कामाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले .

दोन महिन्यांपूर्वी महापालिका मुख्यालयाच्या चारही मजल्यावरील शौचालयांची पाहणी केल्यानंतर चांगल्या दर्जाच्या फरश्या, दैनंदिन साफसफाई, दुर्गंधीमुक्त, पूर्णवेळ देखरेख करणारा कर्मचारी नेमावा आदी बदल करणेबाबत सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या, त्यानुसार घनकचरा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी महापालिकेच्या इमारतीतील शौचालयांच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून अद्ययावत सुविधांसह तळमजल्यावरील शौचालयाचे नुतनीकरण केले.

आयुक्त श्री. बांगर यांनी मंगळवारी महापालिकेच्या तळमजल्यावरील नुतनीकृत शौचालयाची पाहणी केली. त्यावेळी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते. याच धर्तीवर महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालयांचे नुतनीकरण करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. तळमजल्यावर असलेले सर्वाधिक वापरले जाणारे हे शौचालय आहे. त्याचे काम चांगले झाले असून ते नियमित दुर्गंधीमुक्त शौचालय राखणे ही जबाबदारी देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. त्यात कोणतीही तडजोड नको असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था सुधारण्याचा आग्रह आपण धरतो. त्याचबरोबर आपला वावर असलेल्या कार्यालयातील शौचालयांची स्थिती चांगलीच असली पाहिजे व ती नियमित राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या शौचालयाच्या धर्तीवर पालिकेतील सर्व शौचालय सुधारण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच, महिलांच्या प्रसाधनगृहांचीही याच पद्धतीने सुधारणा केली जावी, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.

शहरात पाहणी करताना बहुतांश स्वच्छतागृहे अस्वच्छ तसेच अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्ती करणारा कर्मचारी नसल्याचे दिसून आले. तसेच, पाणी गळती आणि अस्वच्छता यामुळे या स्वच्छतागृहांची स्थिती बिकट असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने कार्यवाही करुन सार्वजनिक शौचालय हे आपल्या घरातील व्यक्ती वापरणार आहे, असे समजून स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील या दृष्टीने काम करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच दिव्यांग व्यक्ती कामानिमित्त महापालिकेत येत असतात, त्यांच्यासाठी सुयोग्य असे प्रसाधनगृह महापालिका मुख्यालयात नाही. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश आयुक्त श्री. बांगर यांनी बांधकाम विभागाला दिले.

*नागरिकांकडून येणाऱ्या अभिप्रायाची तात्काळ दखल घेणे गरजेचे*

स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असतात, त्याची दखल तात्काळ घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी दिव्यांग व्यक्तींनी महापालिका भवनातील आयुक्त कार्यालयाबाहेर असलेल्या गुळगुळीत पांढऱ्या लाद्यावरुन चालताना पाय घसरत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्याची तात्काळ दखल घेत सदर लादीवर कारपेट टाकण्यात आले, त्यामुळे नागरिकांकडून जो अभिप्राय प्राप्त होतो त्याची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी दिल्या आहेत.