Wednesday, August 12 2020 8:43 am

महापालिका आयुक्तांनी केली जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी२० ऑगस्टपर्यंत १००फुट उंचीच्या चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी करून येत्या २० ऑगस्टपर्यंत १०० फुट उंचीच्या चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर त्यांनी मुख्य बाजारपेठेची पाहणी करून तिथे आवश्यक ती साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या.
जवाहरबाग स्मशानभूमी येथे सद्यस्थितीमध्ये ४० फुटाची चिमणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आली आहे. तथापि या चिमणीमधून येणारा धूर तेथील परिसरातील घरांमध्ये पसरत असून तेथील चिमणीची उंची वाढवावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांकडून होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळी उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेविका सौ. नम्रता कोळी, उप आयुक्त संदीप माळवी, सहाय्यक संचालक, नगर विकास विभाग श्रीकांत देशमुख, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्रीडा अधिकारी सौ. मीनल पालांडे, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.
जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेली चिमणी बदलून त्याठिकाणी १०० फुट उंचीची चिमणी बसविण्यात येणार असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत २० ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी आदेशित केले.
यावेळी त्यांनी मुख्य भाजीपाला मार्केटची पाहणी करून त्या ठिकाणी कचरा होणार नाही. तसेच दिवसातून किमान दोन वेळा तरी कचरा उचलण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथील मैदानाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.