Thursday, December 12 2024 8:01 pm

महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्या अनुयायींसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, 9 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अनुयायी अभिवादनासाठी येतात. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दि. रा. डिंगळे, महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महानगरपालिका, गृह व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी. रेल्वेने येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

सुरक्षेची व्यवस्था, चैत्यभूमी तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, आरोग्य व्यवस्था, पुष्पवृष्टी इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.