• रविवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता.
• स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह
• ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’
• अकरावे पुष्प
ठाणे 07 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि प्रख्यात लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार’ या विषयावर ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान, रविवार, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वाजता ही डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. हे व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे. व्याख्यानमालेचे हे अकरावे पुष्प आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे ०६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. या दिवसाचे औचित्य साधून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार’ या विषयावर विचारमंथन व्याख्यानमालेत व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. या दोन पदवी संपादन केल्या. भारतात परतल्यावर मुंबईत सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. मुंबईत ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी मूकनायक नावाचे पाक्षिक काढले. त्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी ही दुर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. सरकारी विधि-महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे व प्राचार्याचेही काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, एम.ए. पदवीकरिता लिहिलेल्या प्रबंधाचा विषय ‘प्राचीन भारतातील व्यापार’ असा होता. ‘भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा: एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक अध्ययन’ या विषयावरील त्यांचा प्रबंध पुढे ‘द इव्होल्यूशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ या नावाने प्रकाशित झाला. या प्रबंधात त्यांनी ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण ब्रिटनमधील उद्योगधंद्याच्या हिताच्या दृष्टीने आखले जाते, हे सिध्द केले. कोणताही देशात एखाद्या वर्गावर अन्याय होतो आहे म्हणून त्या देशाला राजकीय अधिकार नाकारता येत नाही, यासारखी तर्कशुध्द मीमांसा या ग्रंथात आढळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रविषयक दुसरा प्रबंध म्हणजे ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा होय. रूपयाचे पौंडाशी प्रमाण बसवून इंग्रजी राज्यकर्त्यांनी केवळ इंग्रजी व्यापाऱ्यांचेच हित साधून भारताचे कसे नुकसान केले, यावर त्यांनी या प्रबंधात प्रकाश टाकला आहे.
व्याख्याते डॉ. नरेंद्र जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या आर्थिक विचारांचा मागोवा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जाधव घेणार आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. तसेच, नियोजन मंडळाचे सदस्यही होते. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे त्यांचे आत्मचरित्र, जगातल्या वीस भाषांमध्ये अनुवादीत झाले आहे. रिझर्व बँकेत असताना ते अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचे प्रमुख सल्लागार होते. तसेच, साडेचार वर्षे ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’मध्येही कार्यरत होते. त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपदही भुषविले आहे. डॉ. जाधव यांनी तीन भाषेत ३७ पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील २१ पुस्तकांचा तसेच, रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील तीन पुस्तकांचा समावेश आहे.
विचारमंथन व्याख्यानमाला
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे अकरावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले आहे. आजवर या व्याख्यानमालेत डॉ. अनिल काकोडकर, डॉ. आनंद नाडकर्णी, श्री. बाबा भांड, श्री. हरी नरके, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. रमेश जाधव, डॉ. सदानंद मोरे, श्री. श्रीकांत बोजेवार यांनी महनीय व्यक्तिमत्वांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारी व्याख्याने दिली आहेत.