ठाणे (०६) – महात्मा जोतीराव फुले (११ एप्रिल) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल) यांच्या जयंतीच्या निमित्ताने, ठाणे महापालिकेतर्फे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रवाह आणि लोककला या विषयावर ‘लोकजागरा’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत हा लोकजागर सादर करणार आहेत. सोमवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होईल. कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.
महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचार प्रवाहांचा लोककलेवर पडलेला प्रभाव समजून घेण्यासाठी लोकजागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख आहेत. लोककलावंत असलेले प्रा. चंदनशिवे यांनी ‘तमाशाच्या सादरीकरणाची बदलती रुपे’ हा विषय घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी केली आहे. तमाशात काम करणाऱ्यापासून सुरुवात झालेल्या या कलावंताने मराठीत ‘लोकमान्य’ चित्रपटासाठी पोवाडा गायला. तर, ‘बाजीराव- मस्तानी’ या चित्रपटासाठी पोवाडा, शाहिरी काव्य लेखन आणि गायन केले. संगीत नाटक अकादमीच्या उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराने प्रा. चंदनशिवे यांना गौरविण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्यावतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याची कल्पना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मांडली. त्यानुसार, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. बाबा भांड यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाची सुरूवात झाली. या मालिकेतील दुसरे पुष्प प्रा. हरी नरके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने गुंफले. या पुढील पुष्प प्रा. चंदनशिवे आपल्या लोककलेच्या माध्यमातून गुंफणार आहेत.