Monday, June 1 2020 2:48 pm

महागिरीत स्थानिक भूमिपुत्रांनी आणि मुस्लिम समाजाने आनंद परांजपे यांचे केले जोरदार स्वागत

आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे आणि जैन मंदिराचे दर्शन !

ठाणे : संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची प्रचार यात्रा महागिरीतुन सुरु झाल्यावर स्थानिक भूमिपुत्रांनी आणि मुस्लिम समाजाने जोरदार स्वागत केले. यावेळी आनंद परांजपे यांनी आर्य क्रीडा मंदिर मैदानातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शनही घेतले. तसेच टेंभी नाक्यावरील जैन मंदिरात जावूनही  दर्शन घेतले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी(कवाडे), रिपाइं(गवई), रिपाइं(एकतावादी) या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवाशांच्या समस्या ऐकल्यावर थेट सिडको स्थानक, महागिरी कोळीवाडा येथे स्थानिक भूमिपुत्रांशी, कोळी समाजाची संवाद साधला. भूमिपुत्रांनी आपल्या समस्या आनंद परांजपे यांच्याकडे मांडल्या आणि निवडणूकीत विजयाचे आशिर्वादही दिले. तर महागिरी परिसरातील मुस्लिम समाजाने प्रचार रॅली थांबवून आनंद परांजपे यांना हार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी महागिरी येथील कार्यालयात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते काॅम्रेड एम ए पाटील यांनीही आनंद परांजपे यांचे स्वागत करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

आर्य क्रीडा मंडळ मैदानावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याचे दर्शन आनंद परांजपे यांनी घेतले. यावेळी आनंद दिघे समर्थकांनी परांजपे यांचे मनापासून स्वागत केले. ऐन निवडणुकीतही आपले विचारधारा  बाजूला ठेवून आनंद दिघे यांच्या समाधीचे आवर्जुन दर्शन घेतल्याबद्दल दिघे समर्थकांनी परांजपे यांना धन्यवाद दिले. याचवेळी टेंभी नाका येथील जैन मंदिरात जाऊन श्री मुनीसुव्रत स्वामी नवपदजी जिनालयाचे आनंद परांजपे यांनी दर्शन घेतले. यावेळी जैन मंदिरातील ट्रस्टींनी आनंद परांजपे यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे नेते  रविंद्र आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजपूरकर, काँग्रेस महिला अध्यक्षा शिल्पा सोनोने, माजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, इंटकचे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.