नवीमुंबई, 03 :- कोकण विभागात साजरा होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या तीसऱ्या दिवशी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाचा विभागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
कोकण विभागातील सर्व जिल्हा व तालुकास्तरावर गुरुवार दि. 3 ऑगस्ट रोजी आयुक्त डॉ. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताहात ‘एक हात मदतीचा’ हा लोकाभिमुख अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जनसामान्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहेत. पुर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत देय असलेली नुकसान भरपाई, सेवा-सुविधा पात्र नागरिकांची संख्या निश्चित करुन त्यांना अनुषंगिक लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्याकरीता अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात-बारा व 8-अ असे तलाठी स्तरावरुन देय असलेले विविध दाखले तात्काळ प्रदान करण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरीकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतच्या सुचना प्रसारमाध्यमांव्दारे, समाजमाध्यमांव्दारे प्रसारीत करण्यात येणार असून, नागरिकांना कार्यशाळेव्दारे मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन जनजागृतीसाठी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये संकट कालीन बचाव प्रशिक्षण (Mockdrill) आयोजित करुन तज्ञांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामस्तरीय आराखडा तयार करुन ग्रामपंचायत स्तरावर वेगवेगळया नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणती दक्षता घ्यायची याबाबतची माहितीपत्रके प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम गांवात “महसूल अदालत” आयोजित करण्यात येणार आहे.
महसूल सप्ताहात कोकण विभागातील नागरिकांसाठी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या सेवा-सुविधांचा विभागातील सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.