Friday, January 17 2025 7:01 am
latest

महसूल सप्ताहांतर्गत माजी सैनिकांसाठी कल्याण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सैनिकहो तुमच्यासाठी…!

माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन

ठाणे,दि.3 (जिमाका:- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि.१ ते ७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत देशाच्या खऱ्या हिरोंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “सैनिकहो तुमच्यासाठी..!” हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि.५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी 10 वाजता आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये माजी सैनिकांच्या प्रतिभावंत व उल्लेखनीय यश मिळविलेल्या पाल्यांचा व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या माजी सैनिकांचा गुणगौरव समारंभ, विशेष प्रमाणपत्र वाटप, वैद्यकीय शिबीर ,आधार केंद्र तसेच महा-ई-सेवा केंद्र यांचे कक्ष असणार आहेत. या माध्यमातून माजी सैनिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या दाखले प्रमाणपत्र याबद्दलचीही माहिती यावेळी दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सुदाम परदेशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री.प्रांजल जाधव तसेच इतर महसूल विभागाचे अधिकारी, विविध क्षेत्रातील आमंत्रित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही या देशभक्तीपर विशेष कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आवर्जून नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी अभिजीत भांडे-पाटील, कल्याण तहसिलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसिलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.