Tuesday, July 23 2019 2:19 am

मराठीच्या अभिमानाबरोबरच बहुभाषिक होणे आवश्यक – देवेंद्र भुजबळ  चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

क्वालंलपूर-: भाषेतून संवाद होतो. संवादातून भावना कळतात. भावनेतून माणूस जोडल्या जातो, त्याचे साधन केवळ भाषा असते. म्हणून मराठी भाषेच्या अभिमानाबरोबरच झपाट्याने सुरू असलेल्या जागतिकीकरणामुळे प्रत्येकाने बहुभाषिक होणे आवश्यक असल्याचे मत सेवानिवृत्त माहिती संचालक,लेखक देवेंद्र भुजबळ यांनी मलेशियातल्या चौथ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मांडले.
मलेशियातील क्वालंलपूर येथे शब्द परिवाराच्यावतीने आयोजित पाच दिवसीय विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन श्री. भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष दिव्य मराठीचे संपादक, लेखक, संजय आवटे, महाराष्ट्रातील शंभरहून अधिक साहित्यिक, लेखक, कवींची यावेळी उपस्थिती होती.
श्री. भुजबळ यांनी उद्घाटनपर भाषणात भाषेतून इतिहास, लोकपरंपरा, लोकजीवन, संस्कृती कळते, ती जतन, संवर्धन होण्यास मदत होते.म्हणून मातृभाषेला विसरता कामा नये, असे सांगितले. बहुभाषक असल्याने भाषेच्या माध्यमातून लोकांना जोडणे अत्यंत सोपे होते, असेही ते म्हणाले.
सध्या अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 92 वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातील यवतमाळ येथे सुरू आहे. इतर राज्यात अशाप्रकारची संमेलने होत नाहीत, ती महाराष्ट्रात होतात, ही गौरवशाली अशी राज्याची परंपरा आहे. ही साहित्य संमेलने विदर्भ, विद्रोही, आदिवासी, दलित, कोकण, मराठवाडा आदी चाळीसहून अधिक प्रकारातूनही महाराष्ट्रात भरतात. अशा संमेलनातून परस्पर संवाद होऊन साहित्य विचारांची आदान प्रदान होते, ही अभिमानाची बाब आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, शासनानेदेखील अशा संमेलनांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे मतही श्री. भुजबळ यांनी मांडले. शब्द परिवाराने कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान, प्रायोजकत्व न घेता विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे, ही आनंदाची आणि कौतुकाची बाब असल्याचे गौरवोद्गार श्री. भुजबळ यांनी काढले.
या संमेलनासाठी महाराष्ट्रासह परदेशातून कवी, साहित्यिक, लेखक आदींनी उपस्थिती लावली आहे. संमेलनात प्राध्यापकांचे विश्व, यंगीस्तान: नव्या पिढीची भाषा यावर परिसंवाद, कविता संमेलन, गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शब्द परिवाराने यापूर्वी थायलंड, दुबई, इंडोनेशियात संमेलनाचे आयोजन केलेले आहे. संमेलनाचे संयोजन संजय सिंगलवार, प्रभाकर वानखेडे यांनी केलेले आहे.
शब्दांकन : श्याम टरके