Friday, December 13 2024 11:16 am

मराठा समाजातील मुलींसाठी बांधलेल्या वसतीगृहावर अवकळा

ठाणे, 01 – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मराठा विद्यार्थिंनीसाठी बांधण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहावर अवकळा आली आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसलेल्या या वसतिगृहाचे उद्घाटन मराठा समाजातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते करण्यात आले होते. मराठा मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकावरील अन्याय कसा सहन करावा, असा सवाल करीत येत्या शिवजयंतीपर्यंत सुधारणा न केल्यास वसतिगृहाला कायमचे टाळे ठोकू, असा इशारा मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

काही वर्षांपर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सुरु केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाची अवस्था दयनिय झाली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मंगेश आवळे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संतोष मोरे, सचिव ठाणे शहर सुधीर भोसले ,जिल्हा उपाध्यक्ष विलास हांडे, सिद्धेश मोरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रतिभा शिर्के आदी उपस्थित होते.

मंगेश आवळे पुढे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह राज्य शासन आणि ठाणे महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले होते. मात्र, या वसतिगृहामध्ये विविध प्रकारच्या त्रुटी ठेवण्यात आलेल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असे दिसून आले की या वसतिगृहामध्ये खानसामा नाही, मुली राहणार असूनही त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक नाही किंवा पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, शौचालयाची व्यवस्था नाही. असे असतानाही सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वारंवार जाहिराती प्रसारीत करुन सुविधा प्रदान केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नाहीत. मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींच्या बाबतीत ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाने खेळ सुरु केला आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असून तंत्रनिकेतनचे प्राचार्य सचिव आहेत. त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मुली या ठिकाणी प्रवेश घेतच नाहीत. त्यामुळे आपण एका मुलीशी चर्चा केली असता, या वसतिगृहात कोणत्याही प्रकारच्या सुविधाच नाहीत. त्यामुळे आम्ही तिथे जायचेच कशाला? सोनावणे नावाच्या एका ठेकेदाराला व्यवस्थापन सांभाळण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. त्यांच्या मते आपण हॉटेलमधून जेवण देऊ पण खानसामा ठेवणार नाही. तंत्रनिकेतनवाल्यांनी हात झटकून ठामपाकडे बोट दाखविले आहे. तर, ठामपा जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना भेटल्यानंतर मंगळवारी जलवाहिनी सुरु केली. पण, त्याचे पाणी अद्यापही वरील टाकीत पोहचलेलेच नाही.आता तंत्रनिकेतनचे जानराव नामक अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवित आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे आहेत. त्यांना आपण विनंती करतो की, मराठा समाजाचे मुख्यमंत्री असूनही मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकावर अन्याय होणार असेल तर ते कसे सहन करायचे? उद्घाटन करताना तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सुविधा देण्याचे मान्य केले होते. मग, आता सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल करीत मंगेश आवळे यांनी येत्या शिवजयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीपर्यंत जर सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत तर आम्हीच या वसतिगृहाला टाळे ठोकू, असा इशारा दिला.