ठाणे 6 – सरकार मराठ्यांना युद्ध पातळीवर कुणबी दाखले देण्याकरिता मॅरेथॉन बैठका घेत आहे; याचाचअर्थ युद्धपातळीवर ओबीसींवर अन्याय होणार आहे. झुंडशाहीच्या जोरावर जर मराठ्यांचा समावेश ओबीसींमध्ये केला. तर तो आम्ही सहन करणार नाही. ओबीसी नेत्यांचा आवाज दाबला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ओबीसी नेते, मा. खा. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केला.
मा. खा. राठोड म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते की ,ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असे म्हणत होते की, “मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही” परंतु जरांगे-पाटील यांना दिलेल्या आश्वासन आणि कुणबी मराठ्यांकरिता काढलेला जी.आर. यामुळे राज्यभर कोट्यावधी मराठा समाजाला कुणबी असल्याचे दाखले देणार असल्यामुळे ओबीसीच्या १९% आरक्षणामध्ये उघड- उघड घुसखोरी करतील आणि बारा- बलुतेदार यांच्या हक्कावर गदा आणतील तसेच मराठा समाजाचे ओबीसीकरण करून गावकुसात राहणारे परंपरागत व्यवसाय करणाऱ्या जातीवर अन्याय करतील, हे सरकारच्या लक्षात येत नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे . सरकारआता वेळ मारून नेईल ,परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व बाहेर येईल, असा टोला देखील आरक्षण अभ्यासक, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सरकारला लगावला आहे.
आपली भूमिका मराठ्यांना न्याय देण्याची आहे. पण, हे सरकार मराठ्यांसाठी पुरावे शोधत आहेत. पण, पारध्यांचे पुरावे शोधतही नाहीत. बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यात विविध प्रवर्गात आहेत. त्यांनाही एसटी मध्ये सामावून घ्यावे. उपप्रवर्ग करून आरक्षण देता येते. मात्र झुंडशाही, दहशत माजवून ओबीसींवर अन्याय करण्याचा डाव आखला आहे. मात्र , ओबीसींवर अन्याय होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, हे सरकारने ध्यानात घ्यावे, असा इशाराही हरिभाऊ राठोड यांनी दिला.