Tuesday, December 10 2024 8:03 am

मनोरूग्णांसोबत न्यायाधीशांनी चालवली सायकल

ठाणे, २३ : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने ‘एक राईड मनोरुग्णांसाठी – त्यांच्या सामाजिक पुनर्वसनासाठी’ या नववर्षांतील पहिल्या सामाजिक राईडचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यात १०० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. राईड संपन्न झाल्यावर मनोरुग्णालयाच्या आवारात प्रमुख पाहुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, मनोरुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनच्या सदस्यांनी मनोरुग्णांसोबत सायकल चालवली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सायकल चालविणाऱ्या मनोरुग्णांना उपस्थित सगळेच प्रोत्साहन देत होते.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयापासून सायकल राईड सुरू झाली. डॉ. मुळीक, संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सेक्रेटरी दीपेश दळवी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईडला सुरूवात करण्यात आली. यात स्पेशल फोर्सचे कमांडो, मनोरुग्णालयाचे डॉक्टर्स, कर्मचारी देखील सहभागी झाले होते. संस्थेतर्फे मनोरुग्णांसाठी सायकल या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे दालन उभारण्यात आले होते. या दालनात व्यवसाय उपचार विभागाच्यावतीने १२ मनोरुग्णांकडून
बनवून घेतलेल्या दोन सायकल देखील येथे ठेवण्यात आल्या होत्या. या दालनाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मंत्री यांच्या हस्ते व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुर्यवंशी, डॉ. मुळीक आणि आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनचे सदस्य वरुण भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सायकल आणि पर्यावरण यांची सांगड या चित्रांतून मनोरुग्णांनी घातली होती. मनोरुग्णांच्या अंगी अनेक कला दडलेल्या असतात त्यांना वाव देणे गरजेचे आहे अशा शब्दांत मंत्री यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मनोरुग्णांचे कौतुक केले. त्यानंतर मनोरुग्णांसाठी राईड केलेल्या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संस्थेतर्फे मनोरुग्णांना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. मंत्री म्हणाले की, आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे खरोखरच कौतुक आहे. यावेळी त्यांनी उपस्थित सायकलप्रेमींना सायकल चालवण्याचे फायदे विचारले. यावेळी विश्वविक्रम विजेते, सायकलप्रेमी सतिश जाधव यांनी सायकलिंगचे फायदे नमूद केले. त्याला जोड देत सायकलिंगमुळे आजारांवरही मात करता येते असे मंत्री यांनी सांगितले. तसेच, सुर्यवंशी यांनी संस्थेचे काम पाहून मी देखील सायकलिंग करणार असल्याची ग्वाही दिली. डॉ. मुळीक आणि भामरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कोसिआ, डि के इंटरनॅशनल स्कूल, सिद्धिविनायक हॉस्पीटल आणि डॉ. शैलेश उमाटे, वेव्ह म्युझीक यांनी सहकार्य केले.