Tuesday, January 19 2021 11:39 pm

मनसे आमदाराच्या गाडीचा अपघात

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या दिवा-पनवेल मार्गावरील निळजे व दातीवली स्थानकांदरम्यान असलेल्या पुलावरून कार कोसळून गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. सुदैवानं अपघातात कुणीही जखमी झालं नाही. मात्र, अपघातग्रस्त कारचे प्रचंड नुकसान झाले. ही कार मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांची आहे. या अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.
अपघात झाला तेव्हा रुळांवरून कोणतीही रेल्वे गाडी ये-जा करत नव्हती. त्यामुळं अनर्थ टळला. मात्र, यात सुमारे ७५ लाखांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. राजू पाटील यांचा वाहनचालक  खदिर इनामदार हा कार चालवत होता. तो त्याच्या नातेवाईकाला डोंबिवलीत सोडून पुन्हा पलावा सिटीच्या दिशेनं येत होता. त्यावेळी त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं व ही कार थेट दिवा-पनवेल रेल्वे रुळावर कोसळली. मात्र, त्याआधीच इनामदार यानं प्रसंगावधान राखून गाडीबाहेर उडी मारली. त्यामुळं तो वाचला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रुळांवरून हटवण्यात आली.