Tuesday, November 19 2019 3:06 am
ताजी बातमी

मनसेच्या मागणीनंतर महापालिकेला सुचले शहाणपण

ठाणे :- फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये, या मनसेच्या सूचक इशाऱ्याने भानावर आलेल्या ठाणे पालिका प्रशासनाने आज झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या सभेत अधिवास प्रमाणपत्राची अट कायम ठेवली आहे. त्यामुळे मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या लढ्याला यश आले असून परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातील रस्त्यावरच्या लढाईनंतर आता प्रशासकीय लढाईदेखील मनसेने जिंकल्याने सर्वसामान्य मराठी फेरीवाल्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
ठाणे शहरात फेरीवाला धोरण प्रत्यक्षात  उतरविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिवास दाखला बंधनकारक आहे. मात्र पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यावर तोडगा म्हणून आधारकार्ड, वीजबील, घरभाडे करारनामा आदी वास्तव्याचे पुरावे म्हणून ग्राह्य धरुन फेरीवाला परवाना देण्याचे आदेश दिले होते. आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्यास बंधनकारक नसल्याचे उच्च न्यायालयाने देखील सांगितले असून ठाणे शहरात फेरीवाला म्हणून व्यवसाय करण्याचा पहिला अधिकार ठाण्यात वर्षानुवर्षे राहणाऱ्या गोरगरीब ठाणेकरांचा आहे. त्यामुळे आयुक्तांकडून न्यायालयाच्या निर्णयाला ‘कात्रजचा घाट’ दाखवत परप्रांतीयांना शहरात जम बसवून देण्याचा मार्ग सुकर केला जात होता. याबाबत मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आवाज उठवून ठाणे महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या अटी, शर्ती मध्ये कोणताही बदल न करता अधिवास दाखला बंधनकारक करावा व ज्यांना हा दाखला मिळवायचा आहे त्यांच्यासाठी एकदिवसीय शिबीर आयोजित करावे. तसेच आयुक्तांनी कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याविरोधात न्यायालयात दाद मागेल, असा इशाराही पाचंगे यांनी दिला होता. त्याला ग्राह्य धरत आज झालेल्या शहर फेरीवाला समितीच्या सभेत अधिवास प्रमाणपत्र अट शिथिल करण्याच्या निर्णयाविरुद्ध आलेल्या संदीप पाचंगे यांच्या  निवेदनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी परप्रांतीय फेरीवाल्यांची तळी उचलणाऱ्या काही हफ्तेखोरांनी अधिवास प्रमाणपत्र अट कायम ठेवण्यास विरोध केला. मात्र उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी मनसेची मागणी ग्राह्य धरत अधिवास प्रमाणपत्राची अट कायम ठेवली. हा मनसेच्या प्रशासकीय लढ्याचा विजय असून पालिका प्रशासनाने अशा पद्धतीने हफ्तेखोरांच्या तुंबड्या भरण्याचा फेरीवाला समितीआडून निर्णय घेतल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा संदीप पाचंगे यांनी दिला.