Friday, April 19 2019 11:48 pm

मधुमेह- उच्च रक्तदाब व वाढलेल्या वजनामुळे किडनीच्या विकारांमध्ये होतेय वाढ महाराष्ट्रात ४ हजार ६६६ रुग्णांना किडनीची आवश्यकता

मुंबई: वाढत्या लोकसंख्येसोबत आजारांची संख्याही वाढली आहे. धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला आपसूकच जडतात. शरीरातील एखाद्या अवयवाचं काम थांबलं की त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातही मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनामुळे इथे किडनी या अवयवाच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किडनीचे विकार हे ‘सायलेंट किलर’ नावाने ओळखले जातात. याविषयी अधिक माहिती देताना वाशीच्या स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट डॉ. सौम्यन डे म्हणाले, शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. परंतु, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे योग्य काळजी न घेतल्यामुळे मूत्रपिंडाचे विकार जडत आहेत. किडनी संबंधित आजार होण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे मधुमेह, परंतु भारतीयांमध्ये मधुमेह झाल्यावर सरासरी ३ ते ५ वर्षांनी त्यावर योग्य उपचार सुरु होतात व तोपर्यंत किडनीचे आरोग्य बिघडून गेलेले असते. किडनीमधून प्रती मिनिटाला १२०० मिली लिटर रक्त शुद्ध होते. मधुमेह आटोक्यात नसल्यामुळे शुद्ध होऊन जाणाऱ्या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढते त्यामुळे किडनीवर ताण वाढून किडनी फेल होण्याचे प्रमाण वाढते. ”
किडनीचे विकार हे ‘सायलेंट किलर’ असल्याने बर्‍याचदा अंतिम टप्प्यात आल्यानंतरच ते रुग्णांच्या लक्षात येतात. मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याने अनेकदा किडनीचे विकार जीवावर बेतू शकतात.
किडनी विकाराची लक्षणे

.मूत्राचा रंग लालसर होणे
.पाठीत किंवा एका बाजूला (कुशीत) दुखणे
.मूत्रविसर्जनाच्या प्रक्रियेत त्रास/ वेदना होणे
.मूत्रासोबत रक्त जाणे
.पाय आणि गुडघ्याच्या वाटीला सूज येणे
.फेसाळ मूत्र जाणे
.अतिशय थकवा जाणवणे, अशक्त वाटणे
.मळमळणे व उलट्या होणे
.धाप लागणे
किडनी निरोगी राहण्यासाठी रोज १० ते १२ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. नियमित व्यायाम व वजन नियंत्रणात असावे. चाळिशीनंतर मिठाचे प्रमाण कमी
करावे. व्यसनांपासून दूर रहावे. आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध अजिबात घेऊ नये असा सल्ला स्टर्लिंग वोक्हार्ट हॉस्पिटलचे यूरोलॉजिस्ट
डॉ. सौम्यन डे त्यांनी दिला.