Sunday, December 16 2018 5:31 am

मधुमेहाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी बोरिवलीत बच्चे कंपनीची वॉकथॉन !

मधुमेह दूताचे काम करणार शाळकरी मुले . 
मुंबई – : मधुमेहातील आहार व उपचार  हा अत्यंत दुर्लक्षित विषय असून भारतातील मधुमेही रुग्ण आहार संकल्पनेच्या बाबतीत अशिक्षितच असून आता बच्चे कंपनीने  मधुमेहाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मला मधुमेहाचा त्रास आहे म्हणून मी मी कारल्याचा रस घेतो, सकाळी कडुनींब खातो, गेली १० वर्षे मी आंबा खाल्लेला नाही अशा प्रकारच्या गप्पा मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी रंगलेल्या असतात. एखादे औषध मधुमेही रुग्णाला लागू झाले तर तेच औषध दुसऱ्या रुग्णाला लागू पडेल याची शाश्वती नसते तरीही बरेच  रुग्ण ते औषध अनेक वर्षे घेत राहतात व त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. एखाद्या ऐकीव उपचारावर अंधविश्वास ठेवून अनेक मधुमेही रुग्ण आपले आयुष्य धोक्यात आणतात. बोरीवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या वतीने रविवार  दिनांक ९ डिसेंबर रोजी बोरीवली (पश्चिम ) येथे शाळकरी मुलांची वॉकथॉन आयोजित केली आहे. याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मधुमेहविकार तज्ञ डॉ इंदूमती कुबेरन म्हणाल्या, ”  मधुमेहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून  याविषयी असलेले गैरसमज जर दूर केले तरच त्याच्याशी दोन हात करणे सोपे जाईल. मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम, औषधोपचार व या आजाराविषयीचे पुरेसे ज्ञान या बाबींचा प्रसार व प्रचार करणे महत्वाचे आहे म्हणूच आम्ही शाळेतील मुलांना एकत्र करून ही वॉकथॉन करणार आहोत जेणेकरून बालवयातच त्याना मधुमेहाविषयी योग्य माहिती तसेच हा आजार जाणून घेण्याविषयी अधिक जिज्ञासा तयार होईल. या वॉकथॉननंतर आम्ही या मुलांना मधुमेहाविषयी योग्य व सविस्तर माहिती देणार असून ते अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल समूहाचे “मधुमेह दूत ” असणार आहेत. आपल्या राहत्या वस्तीत अथवा संकुलामध्ये मधुमेहाविषयी योग्य माहिती देण्यासाठी या बच्चे कंपनीचा हातभार लागणार आहे. “
बोरीवलीतील चंदावरकर रोड, भाबई नाका, स्टेशन रोड असा २ ते ३ किलोमीटर परिसरात सकाळी ८ ते १० या वेळेत  ही वॉकथॉन होणार असून यामध्ये सेंट रॉक्स स्कूल व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मधील १० ते १४ वयोगटातील दीडशे मुले सहभागी होणार आहेत. कारल्याचा अथवा दुधीभोपळ्याचा  रस पिऊन मधुमेह घालवा, अशी जाहिरातबाजी आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे , परंतु मधुमेहातील वैद्यकीय  गुंतागुंतींचा विचार करता योग्य  डॉक्टर अथवा हॉस्पिटल निवडणे आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे हाच संदेश या वॉकथॉनमधून दिला जाणार आहे.