Sunday, May 19 2024 12:12 am

मतदानासाठी यंत्रणा सज्ज; मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम

चौथ्या टप्प्यासाठी 13 मे रोजी मतदान ; 23 हजार 284 मतदान केंद्र
सुमारे 2 कोटी 28 लाखांपेक्षा जास्त मतदार ; यंत्रणा संपूर्ण तयारीसह सज्ज
तिसऱ्या टप्प्यात सरासरी 63.55 टक्के मतदान
विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर
मुंबई, 12 : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान होत असून असून निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी प्रत्यक्ष निवडणूककरिता लागणारे साहित्य, साधनसामुग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव (उस्मानाबाद), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्पात एकूण सरासरी 63.55 टक्के मतदान झाले.

चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा अकरा मतदारसंघामध्ये 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

यासाठी एकूण २३ हजार २८४ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत २ कोटी २८ लाख १ हजार १५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. या अकरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ५३,९५९ तर कंट्रोल युनिट (सीयु) २३,२८४ आणि २३,२८४ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी अकराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत

प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात एकूण 78 हजार 460 शस्त्र परवाने वितरीत करण्यात आली आहेत. त्यापैकी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 9 मे पर्यंत 50,831 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. परवाने रद्द करून 1,132 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,851 इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,22,834 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 59.29 कोटी रोख रक्कम तर 45.72 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 162.40 कोटी रुपये, ड्रग्ज 244.59 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०१.६६ कोटी रुपये अशा एकूण ६१४.१४ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४१,१३४ तक्रारी निकाली

16 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ५४३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ५४१५ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४१,९६५ तक्रारीपैकी ४१,१३४ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

माध्यम देखरेख व संनियत्रण समितीमार्फत जाहिरातीच्या पूर्वप्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 236 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर

भारत निवडणूक आयोगाच्या 8 मे रोजीच्या प्रसिद्धीपत्रानुसार राज्यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे मुंबई व कोकण विभाग असे दोन पदवीधर मतदार संघ आणि नाशिक विभाग व मुंबई असे दोन शिक्षक मतदार संघ याकरिता द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार बुधवार, 15 मे रोजी अधिसूचना निर्गमित करणे, नामनिर्देशनाची शेवटची तारीख 22 मे, नामनिर्देशन पत्राची छाननी 24 मे रोजी होईल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख 27 मे अशी आहे. तर 10 जून रोजी सकाळ 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर 13 जून रोजी मतमोजणी करण्यात येईल.