Thursday, December 5 2024 5:20 am

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी – मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, 21 :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री यादव बोलत होते. यावेळी सर्व विभागाचे समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांच्या फाँर्मची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करावी. लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. प्रत्येक मतदाराला मतदान स्लिप देण्यात यावी. ज्या भागात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. त्याठिकाणी विशेष लक्ष वेधून आणि कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून त्याप्रमाणे नियोजन करावे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.