ठाणे 23 : राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार शिक्षक मतदार संघ कोकण विभाग निवडणुकीसाठी दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सदर दिवशी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण विभाग अनघा कदम यांनी दिली आहे व तसे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील फक्त निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या, मतदार यादीत नाव असलेल्या (मतदान नोंदणी केलेल्या) कार्यरत शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. सदर दिवशी शालेय कामकाजाचा दिवस असल्याने मुख्याध्यापक, सेवाज्येष्ठ शिक्षक यांनी सदर अंमलबजावणीबाबत शालेय वर्गाचे नियोजन करावे जेणेकरुन कोणत्याही प्रकारची तक्रार विद्यार्थी व पालक यांच्याकडून येणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.