Thursday, December 5 2024 5:16 am

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ई -उपस्थितीत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई, 13 : सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) टप्पा-२ या प्रकल्पांतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.

यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता हांडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयातील ऑनलाईन समारंभस्थळी उपस्थित होते.

हॅमच्या माध्यमातून राज्यातील विविध ठिकाणी येत्या अडीच वर्षांच्या काळात ६ हजार कि.मी लांबीचे रस्ते पूर्णत्वास येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हॅमच्या माध्यमातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून एकूण ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांची कामे होणार आहेत. यापैकी ३० टक्के निधी हा राज्य शासनामार्फत व ७० टक्के निधी हा कर्ज स्वरूपात विविध वित्तीय संस्थाकडून उभारण्यात येत आहे.

कर्ज स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या निधीपैकी सद्यस्थितीत रूपये ५,५०० कोटी इतका निधी कर्ज स्वरूपात देणेबाबत हुडको या वित्तीय संस्थेसमवेत अंतिम वित्तीय करारनामा करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत होणारे सर्व रस्ते हे काँक्रीट पृष्ठभागाचे होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन संबंधित भागांचा आर्थिक विकास होणे, वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी होणे, पर्यावरणाचे प्रदुषण कमी होवून आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होणे, आपत्ती निवारणास मदत होणे, पर्यटनात वाढ होणे, रोजगार निर्मिती होणे असे अनेक फायदे होणार आहेत.

हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत कोकण विभाग-१५, पुणे विभाग-२८, नाशिक विभाग-२४, छत्रपती संभाजीनगर विभाग-२०, नांदेड विभाग-१३, अमरावती विभाग-३०, नागपूर विभाग-१५ अशी एकूण १४५ प्रकल्प मंजूर आहेत. सदर प्रकल्पांची निविदा निश्चिती करण्यात आलेली असून भूमिपूजन झालेल्या कामांचा आजपासून शुभारंभ करण्यात येत आहे.

नव्याने होणाऱ्या या रस्तांमुळे रस्त्यांमुळे गावांमधील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक व पर्यटन स्थळे चांगल्या दर्जाच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन रोजगार उपलब्ध होणार आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे १० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत ब्रीज कम बंधारा बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्याच्या लांबीमधील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत. तसेच जल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे प्रकल्प राबविताना सामाजिक व पर्यावरण सुरक्षा सांभाळली जाणार आहे.