Tuesday, July 23 2019 10:18 am

भिवंडीत बोगस डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा

भिवंडी :- भिवंडीतील नवीवस्तीमध्ये वैद्यकीय डिग्री नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय डिग्री नसतानाही क्लिनिक चालू करून हे डॉक्टर दाम्पत्यावर बिनधास्त रुग्णाचे उपचार करत होते. भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दवाखान्यातून औषधे आणि उपकरणेही जप्त केली आहेत. दाम्पत्याला नोटीस बजावली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बिजू वर्गीस तौपील , त्याची पत्नी वलसा अशी या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. या दाम्पत्यानी भिवंडीतील नवीवस्तीमध्ये एम. एम. नावाचे क्लिनिक चालू केले.वैद्यकीय डिग्री नसताना लोकांवर उपचार केल्यामुळे लोकांवर त्यांच्या उपचाराचा विपरीत परिणाम होऊन लागल्याने भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्यांची तक्रार लोकांनी केली. या तक्रारीनंतर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केली असता त्यांच्या कडे वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासून बोगस डॉक्टर असल्याचे आढळून आले.  त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नवीवस्ती भागात बोगस डॉक्टरांचा शोध घेऊ लागले. तौपील दाम्पत्याच्या एम. एम. क्लिनिकला भेट दिली असता याठिकाणी बेकायदा वैद्यकीय व्यवसाय चालू असल्याचे आढळून आले. तौपील यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र नव्हते.

या क्लिनिकमधून पाच हजार रुपये किमतीची औषधे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. अधिकृत वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत फसवणूक करणाऱ्या तौपील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भिवंडी महापालिकेच्या नवीवस्ती आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तक्रार दिली असून पोलिस उपनिरीक्षक हनीफ शेख तपास करत आहेत. अद्याप या दाम्पत्याला अटक करण्यात आलेली नाही.