ठाणे : भिवंडी शहरात अनधिकृतपणे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंज सुरुच असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीवेळी उघडकीस आले असतानाच, पुन्हा एकदा बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून ऑपरेटरला अटक केली आहे. तबरेज सोहराब मोमीन (वय ३४ रा. कारीवली, भिवंडी) असे अटक केलेल्या बोगस टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील सुभाष नगर, नालापार, मतीन शेख चाळीत बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन येथील एक्सचेंज सुरू असल्याची माहिती मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या ठाणे युनिटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे 15 फ्रेबुवारी रोजी दुपारच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने या बेकायदा आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज धाड टाकली होती. त्यावेळी भिवंडी तालुक्यातील कारीवली ग्रामपंचायत परिसरात राहणारा तबरेज सोहराब मोमीन हा एजंट म्हणून काम करत असताना बेकायदा आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचे समोर आले.
सार्वजनिक टेलिफोन नेटवर्कद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात अडचणी येत असल्याने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागते. परंतु आरोपी तबरेज सोहराब मोमीन याने कोणतीही परवानगी न घेता आपल्या जवळच्या एजंटांमार्फत भारतातील हव्या त्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल्स अनाधिकृतपणे वळवून भारत सरकारची फसवणूक केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात समोर आले. बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजचा हा प्रकार स्थानिक मोबाईल नेटवर्क सेवा कंपन्या आणि भारत सरकारचे आर्थिक नुकसान करून देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याने आरोपीकडील बेकायदा टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यासाठी लागणारे 70 हजार 500 रुपयांचे विविध उपकरणे जप्त केली आहे.