Thursday, December 12 2024 8:44 pm

भाषिक सौहार्दाचं दर्शन घडविणा-या ‘अष्टवामा’ कथासंग्रहाचे प्रकाशन

ठाणे, २१ भाषिक सौहार्दाचं दर्शन घडविणाऱ्या ‘अष्टवामा’ या मराठी व हिंदी भाषांतील कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अनुवादक चंद्रकांत भोंजाळ उपस्थित होते. तसेच कवयित्री चित्रा देसाई, लेखिका रश्मी रविजा, ‘आम्ही सिद्ध लेखिका संस्थे’च्या अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग व महाराष्ट्र टाइम्सचे वृत्त संपादक राजीव काळे उपस्थित होते. यावेळी ‘गोमती किनारे’ या डॉ. जया आनंद याच्या हिंदी काव्यसंग्रहाचेही प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चंद्रकांत भोंजाळ यांनी नवलेखन करणाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नवलेखकांनी लेखनात सातत्य ठेवले पाहिजे, लिहिलेले लेखन मोबाईलच्या स्क्रिनपुरते मर्यादित न राहता कागदावर छापले गेले पाहिजे. अक्षररूपाने लेखक नेहमी अमर राहतो हे सांगताना त्यांनी लेखकाने वाचन कसे वाढविले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
प्रा. पद्मा हुशिंग यांनी हिंदी व मराठी भाषा यांचा संगम अष्टवामा या कथा संग्रहात कसा पाहायला मिळतो हे सांगताना दोन्ही पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे वेगळेपण अधोरेखित केले. राजीव काळे यांनी सांगितले की, सध्या भाषाभाषांमध्ये वाद पेटत असताना अष्टवामात असणाऱ्या दोन भाषांतील कथांचं साहचर्य सुखावणारं आहे. त्यांनी प्रत्येक लेखिकेची लेखनशैली थोडक्यात स्पष्ट केली. प्रसिद्ध कवयित्री चित्रा देसाई ‘गोमती किनारे’ या कवितासंग्रहाविषयी म्हणाल्या की, कोणत्याही पुस्तकाचे स्वागत नवजात शिशूसारखे केले पाहिजे. कविता माणसाला संवेदनशील बनवते हेही त्यांनी सांगितले. प्रसिद्ध लेखिका रश्मी रविजा यांनी अष्टवामातील कथांचा थोडक्यात परामर्श घेतला.
हिंदी व मराठी भाषांतील एकत्र कथासंग्रह काढण्यामागची भूमिका व प्रेरणा डॉ. जया आनंद व प्रा. मंगल कातकर यांनी आपल्या मनोगतातून मांडली. कार्यक्रमाचे निवेदन आर. जे. नितू यादव व कविता भोसले यांनी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून केले. यावेळी मानसी जोशी व अलका दुर्गे यांनी अनुक्रमे मराठी व हिंदी कथा सादर केल्या तसेच मंगल कातकर यांनी ‘गोमती किनारे’ या संग्रहातील कविता सादर केली. अष्टवामा संग्रहाचे संपादन डॉ. जया आनंद यांनी केले असून या कथासंग्रहात एकूण आठ लेखिकांच्या कथांचा समावेश आहे. डॉ. रंजना जयसवाल, डॉ. गीता द्विवेदी, डॉ.पूनम मानकर पिसे, डॉ. जया आनंद या हिंदी लेखिकांच्या व प्रा. मानसी जोशी, डॉ. अलका दुर्गे, वर्षा फाटक, प्रा.मंगल कातकर या मराठी लेखिकांच्या कथांचा समावेश या कथासंग्रहात असून हा संग्रह उज्जैनच्या श्रीहिंद प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.